Sunday, April 7, 2024

मानसीचा चित्रकार तो !


मुंबईच्या फोर्ट भागातील "जहांगीर आर्ट गॅलरी" चा कलेच्या उपासकांनीं गजबजलेला तो प्रशस्त हॉल. एयरकंडिशन चा मस्त गार-गार वारा. त्यात देशी-विदेशीं सह गोऱ्या समूहात पारशी पाहुण्यांचा भरणा जास्त.  ह्या सगळ्या चित्रवेड्या कलाप्रेमींच्या गराड्यात, आपल्या मॉडर्न आर्टचे किस्से, प्रत्येक चित्राची संकल्पना, मध्यवर्ती आशय समजावून सांगण्यात मग्न असलेला ...एक धुंद, स्वच्छंद, मनमौजी, एक सच्चा, हाडाचा कलाकार... मूर्तिकार, छायाचित्रकार, चित्रकार आणि शिल्पकार,  - कै.जयराम वसंत गोवेकर.. ..... मानसीचा चित्रकार !   

कोकणातल्या अथांग समुद्राशी एकनिष्ठ असलेला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या "मालवण" गावचा हा दर्यादिल सुपुत्र.  नारळा-आंब्या-फणसाच्या बागांतून सुसाट धावत असलेल्या बेभान वाऱ्याप्रमाणेच कधी कुठल्याच सांसारिक किंवा व्यावहारिक चौकटीत, स्वतःला जखडून न ठेवता स्वतःच्या हिंमतीवर जगणारा.... आपल्या अश्या एका  वेगळयाच चित्रविश्वात रमणारा...... शिल्पकलेत आकंठ बुडलेला हा कलेचा पुजारी...... आपल्या लाल मातीशी इमान राखणारा हा कोकणपुत्र! असं म्हणतात  की, कोकणी माणूस हा निसर्गतः कलेचं वरदान लाभलेला...  जन्मतः नाट्य, कला, संगीतावर जीव ओवाळून टाकणारा... !  
T.V. वर राज कपूरजीं चा सिनेमा सुरु झाला की पप्पा (गोवेकर) नेहमी म्हणायचे, हे बाळचं चित्र, हा बाळ चा बॅनर, ही बाळ ची मूर्ती. नंतर नंतर जसजसं समजायला लागलं, तसं  "बाळ" ह्या व्यक्तीबद्दल आदर, सन्मान वाढतंच गेला. बाळ म्हणजे आमचे "बाळकाका" - आमच्या पप्पा गोवेकरांचा सख्खा मोठा भाऊ.... आमच्या गोवेकर घराण्यातील आणखी एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व! 

त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाची तारीख ठरली कि, बाळकाकांचा आमंत्रणाचा फोन ठरलेला.  मग आम्ही सगळी भावंड खूप आनंदायचो आणि मोठ्या उत्साहाने तयारीला लागायचो. लहानपणी आम्ही सगळी चुलत-आते भावंड मिळुन दादर T.T. हून  (बेस्ट क्रमांक १ - काळा  घोडा - जहांगीर आर्ट गॅलरी ) पकडून, बाळकाकांच्या प्रदर्शनाला आवर्जून जायचो. छान इस्त्रीचे कडक कपडे, पायात मोजे, चकाचक पॉलिशचे बूट, अगदी टीप-टॉप तयार होऊन नटुनथटून निघायचो.  बाळ काकांचे खास "छोटे" पाहुणे म्हणून आम्हाला विशेष भाव मिळायचा.  त्यांची मॉडर्न आर्ट समजण्या एवढे वयाने आणि बुद्धीने देखील लहानच होतो, पण त्यांना मिळणारा मान-सन्मान, आदर, प्रेम समजण्या इतपत नक्कीच मोठे होतो. 

पूर्वी कोकणात एकत्र कुटुंब पद्धतीत घराचा गणपती, त्या घरातलाच एखादा मूर्तिकार करीत असे.  लहानपणापासूनच  शिल्पकृती, abstract पेन्टिंगस  बनवायची नैसर्गिक देणगी लाभलेले बाळकाका गोवेकरांचा गणपती, स्वतः करायचे. गणपतीची मूर्ती बनविताना ते एवढे तल्लीन होत असत कि,  कित्येकदा त्यांच्या बोटातल्या सोन्याच्या आंगठ्या ण त्या मूर्तीस बहाल केल्या गेल्याचे किस्से, आम्ही आजीकडून ऐकल्याचं मला चांगल आठवतं.  त्यावेळी लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवात बाळकाका सक्रिय भाग घेत असतं. रात्ररात्र जागून गणपतीची मूर्ती, त्यामागचे पडदे, आरास, फिरत्या मातीच्या बाहुल्यांचे चित्र-देखावे, स्वतः बनवत असत. ते काम आटपून कोकणात आपल्या स्वतःच्या घरची गणेशमुर्ती घडवायच्या कामास लागत.  हातात घेतलेलं चित्र-शिल्पकलेचं कोणतंही काम, स्वतःच्या मनाजोगं पूर्ण होई पर्यंत त्यांचं दुसरीकडे कुठेही लक्ष लागत नसे.  चित्रकले बरोबरच बाळकाका पाककलेत देखील निपुण होतें. माश्याच्या कालवणाच्या रंगावरून, किंवा नुसत्या वासाने ते कसं झालं आहे, ते अचूक टिपत असत. 

इतर चाकरमान्यांप्रमाणेच पोटापाण्याच्या विवंचनेतून नोकरीसाठी कोकणातून मुंबईची वाट धरलेले माझे आजोबा, त्यावेळी लालबाग इथल्या "बावला बिल्डिंग" ह्या चाळीत एका छोट्याशा खोलीत रहात असत.  बाळकाकांचा चित्र आणि शिल्पकलेचा व्यासंग पाहून, पुढे त्यांनी चित्रकला क्षेत्रातच करियर करायचं ठरवलं.  मुंबईतल्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टस्  मधून "मॉडर्न आर्ट" मध्ये पदवीसह विशेष नामांकन पटकावून बाळकाकांनी, ह्या मुंबापुरीत आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली.  आपल्या कलेच्या सामर्थ्यावर, या कलाकाराने  हिंदी चित्रपट सृष्टीत भक्कम पाय रोवला. आणि  R.K. प्रॉडकशन्स - R.K बॅनर (१९५० ते १९७० ) साठी काम करायला सुरुवात केली. हिंदी चित्रपटांचा सुवर्ण काळ - Golden Era!  ह्या काळात बरसात, आवरा, आग, श्री. ४२०, मेरा नाम जोकर, बॉबी अश्या  एका पेक्षा एक सुपरहिट, अवॉर्ड विनिंग चित्रपटांनी फक्त हिंदी सिनेसृष्टीच नाही तर संपूर्ण जगभरात आपला ठसा उमटवला. त्यांच्या चित्रकौशल्याबद्दल मोरारजी भाई देसाईंच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने  सन्मानित करण्यांत आलं होतं.

ह्या चित्रपटातून झळकलेल्या, बाळकाकांच्या सर्व शिल्पकृती, पोस्टर्स, तैलचित्र, वेगवेगळ्या मूर्ती , विशेषतः - "mother & child" शिल्पकृती, रंगीत पडदे जणू काही कपूर घराण्याची "दिलोंकी धडकन" बनली.  अनाडी चित्रपटातील सायकल वरून जाणाऱ्या राजजींच्या हातातली सगळी चित्रं,  प्रत्यक्षात ह्या कलाकाराने रेखाटली होती. मुंबईतल्या चेंबुर च्या R.K. Studios मध्ये समस्त कपूर कुटुंबियांसमवेत गणपती आणि होळी मोठ्या उत्साहाने साजरी व्हायची.  सगळ्या उत्सवात, आनंदाच्या क्षणी, घरच्याच सदस्यांत बाळकाकांची आग्रहपूर्वक गणना होत असे..  

अर्थात आत्तासारख्या फिल्म मेकिंगच्या डिजिटल युगातील आधुनिक-तांत्रिक सुखसोयी त्याकाळी  सिनेक्षेत्रात नक्कीच नव्हत्या ... त्यामुळे प्रत्यक्ष आर्ट टीमच्या कौशल्यपूर्ण  कारागिरीचा पूर्णतः कस लागायचा. ह्या दरम्यान, बाळकाकांनी स्वतःच्या हाताने रंगविलेल्या पडद्यावरच्या उफाळलेल्या समुद्राच्या लाटा अगदी हुबेहूब भासत. आणि हीच त्यांच्या कामाची खासियत कपूर घराण्यातील सगळ्या सदस्यांना अक्षरशः भुरळ पाडत असे. राजजीं बरोबरची त्यांची मैत्री पुढे पुढे वाढतच गेली.  हळुहळू बाळकाकांच्या प्रदर्शनाला सगळीच कपूर मंडळी आणि बॉलीवूड मधली बरेच नामवंत सिनेकलाकार, इतर सुप्रसिद्ध नट-नट्या अगदी वेळात वेळ काढून हजेरी लावू लागली.  

बाळकाकांनी, आर. कै. बॅनर्स साठी बरीच वर्षे काम केलं.  नंतर पुढे, एका चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान झालेल्या भीषण अपघातामुळे पडद्यामागचे बरेचसे कारागीर, स्टेज बॉईज, आगीत होरपळून जबर जखमी झालें.  चित्रपटांच्या सेट वर होणाऱ्या अश्या अपघातांविषयीच्या बातम्या, आजही आपण  ऐकत असतो. अर्थात त्यावेळी ह्या सगळ्या पडद्यामागील स्टाफ ला मिळणारं वेतन हे  किरकोळच असायचं. आणि त्यात शूटिंग च्या वेळी वारंवार होणारे हे अपघात - ही एक अनिवार्य बाब होती.  त्याकाळी अपघातात सापडलेल्या कारागिरांच्या कुटुंबीयांची कुठल्याही प्रकारे परवड होऊ नये म्हणून ह्या सगळ्या कामगारांचा पगारवाढ होणं हे अत्यंत गरजेचं होतं. आर.के बॅनर्स चे सगळे चित्रपट प्रसिद्धीच्या शिखरावर असलें तरी वर्षानुवर्षे कामगारांच्या वेतानात काहीच वाढ  होत नव्हती.  

समस्त कामगार वर्गाने नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीच्या मागण्या करायला सुरुवात केली, पण ह्या वेतन वाढीची फारशी दखल घेतली गेली नाही. कामगारांनी चिडून सरते शेवटी संप करून, आपल्या मागण्या मॅनेजमेंट पर्यंत पोहोचविल्या.  पण दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष केले गेले.  एक सच्चा कलाकार ह्या नात्याने, कलेशी इमान राखणाऱ्या आपल्या इतर सहकाऱ्यांवर  होणारा अन्याय, बाळ काकांना अर्थातच सहन झाला नाही.  मॅनेजमेंटच्या ह्या अनपेक्षित वर्तनाने, कलेशी स्वामिनिष्ठ असलेल्या बाळ काकांनी देखील तडकाफडकी नाराजी व्यक्त करून, आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. पुढे हे प्रकरण चिघळतंच गेलं.  कंपनीच्या युनिअनच्या खटल्यात बाळ काकांनी कामगारांची बाजू घेतल्याने, या दोघांच्या दोस्तीला पुरतं गालबोट लागलं आणि तात्त्विक वादामुळे हे दोन जीवलग मित्र काहीकाळ थोडेसे दुरावले!


असं म्हंटलं जातं कि कलाकार हा शापित असतो... आणि त्याच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत... तसच काहीसं बाळकाकांच्या बाबतीत घडलं.  फारश्या प्रसिद्धी झोतात न राहण्याची त्यांची वृत्ती.. किंवा आपल्या कलेशी इमान राखतांना, पैश्याच्या मागे न लागण्याचा मूळ स्वभाव किंवा नशिबाची साथ नसेल कदाचित ...!  हे दुर्दैवाने "झाकलं माणिक" झाकलंच राहिलं ...

पुढे बाळकाकांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली आणि लहान मुलांना "मॉडर्न आर्ट" शिकवायची त्यांची खूप आधीपासूनची इच्छा पूर्ण केली. आणि जास्तीत जास्त सामान्य लोकांपर्यंत ह्या कलेचा विकास व्हावा ह्यासाठी, ते सतत प्रयत्नशील राहिले. सगळ्या लहान मुलांना ते अगदी सोप्या पद्धतीने गपणतीचे चित्रं काढायला शिकवीत असत आणि त्यांचा समस्त शिष्यगण - सगळी चिल्ली-पिल्ली देखील, त्यांच्यासमवेत चित्रकलेत अगदी रममाण होत असत.   शिवचरित्रातले  काही ऐतिहासिक क्षण म्हणजे शिवजन्मापासुन ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या सगळ्या रोमांचक आठवणी त्यांनी आपल्या चित्रांद्वारे हुबेहूब टिपल्या.  बाळकाकांच्या शिवराज्याभिषेकाच्या चित्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील सुवर्णालंकार, मोत्याच्या माळा अगदी खऱ्या वाटायच्या.  पुढे, त्यांनी  माझ्या सगळ्यात मोठ्या, शिक्षिका असलेल्या आत्याच्या "हडी" गावातल्या शाळेला छोट्या मुलांना भेट म्हणून,सगळी चित्रं दान केली. आजुबाजूच्या गावांतून, खूप लांबून लांबून लोक, ही चित्रं बघायला शाळेत गर्दी करीत असत. प्रत्येक चित्रातली वास्तवता, कुठेतरी मनात घर करत असल्याने, ही सगळी मंडळी अक्षरश: अचंबित होत असत. आणि अगदी मनापासुन उत्स्फुर्त दाद देत असत. असो. 

बाळकाकांची एकीकडे नोकरी चालू होतीच आणि सोबत चित्रांची प्रदर्शने सुद्धा.  राजजी आणि समस्त कपूर कुटुंबीय पुन्हा एकवार आवर्जून बाळकाकांच्या प्रदर्शनाला येऊन भरभरून त्यांचं कौतुक करू लागली.  काही तात्त्विक वाद वगळता, ह्या दोन मित्रांची मैत्रीची घट्ट वीण वाखणण्याजोगी होती. 

मला राहून राहून असं वाटायचं कि बाळकाकांच्या ह्या सगळ्या आठवणीं, त्यांचे अनुभव, त्यांचा चित्रप्रवास कुठेतरी शब्दरुपात जतन करावा. आणि त्यात माझी साथ दिली ती माझ्या ताईने (सौ.रेश्मा गोवेकर-जाधव). तिने जपून ठेवलेल्या ह्या फोटोंमुळे आणि मार्गदर्शनामुळे, ह्या जुन्या आठवणींचा अमूल्य ठेवा, तुम्हा सगळ्यांबरोबर वाटतांना, खरंच खूप अभिमान वाटतो आहे.  ह्या कलेच्या पुजाऱ्याला आमची भावपूर्ण शब्दरुपी "आदरांजली" !   

गेल्या २/३ वर्षांपूर्वी (२०१७) R.K स्टुडिओस  लागलेल्या भीषण आगीमुळे बरंच नुकसान झालं आणि बराचसा स्टुडिओ एका रिऍलिटी शो च्या शूटिंग च्या दरम्यान जळून बेचिराख  झाला. आणि झर्रकन मन लहानपणीच्या दादर -हिंदू कॉलनीतल्या  "राजगृह"च्या आठवणींत रमलं.  आणि प्रकर्षाने जाणवलं, कुठेतरी ह्या दोन जिवलग मित्रांचे आत्मे हळहळले असतील ... जिथे कुठे असतील तिथे कदाचित आजही मॉडर्न आर्ट वर चर्चा चालू असतील - राजजीं बरोबर कला-दिग्दर्शनाच्या गप्पा रंगल्या असतील. लता, मुकेश, नर्गिस, मधुबाला यांची गाणी गुणगुणत ... किंवा शंकर-जयकिशनजींच्या चालीवर मंत्रमुग्ध होऊन असं ही म्हणत असतील ... 

हम ना रहेंगे, तुम ना रहोगे ..फिर भी रहेंगी निशानीया !!

सरोज स्नेहल-सुरेश गोवेकर 
मी मराठी ..🙏🙏









No comments:

Post a Comment