माझे माहेर पंढरी ..... (पप्पा सांगा कुणाचे?… पप्पा, आम्हा चौघांचे ...!! - भाग २ )
४ फेब्रुवारी - आज पं. भीमसेनजींचा वाढदिवस. भारदस्त पहाडी आवाज, उच्च कोटीचे स्वर आणि दैवी देणगी लाभलेलं गळ्यातील अवर्णनी
डोळे बंद करून त्यांचे अभंग ऐकतांना अनुभवायचा, तो म्हणजे फक्त पंडितजींच्या स्वर्गीय स्वरांमधला विठूमाऊलीचा अदभुत साक्षात्कार आणि अव्यक्त अनुभव. रागाच्या रंजकतेच्या बाबतीत विशेष लक्ष देऊन, गाणं समाजणाऱ्यांपासून ते थेट गाणं न समाजणऱ्यांपयंत सर्वांना प्रभावित, मंत्रमुग्ध करणारा एकमेव नादपुत्र - पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न , डॉ. "श्री. पंडित भीमसेन जोशी" .... पुन्हा ऐसे रत्न होणें नाही.....!
वास्तविक असं म्हंटलं जातं की जात -पात किंवा हिंदु ,मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी अश्या कोणत्याही धर्माच्या बंधनाला न जुमानणाऱ्या गायक कलाकाराचा एकच धर्म असतो आणि तो धर्म म्हणजे "साक्षात्कारी पुरुषांचा वरदहस्त". राघवेंद्र स्वामींचा आशीर्वाद लाभलेल्या भीमसेनजींना, आपल्या आईकडूनच कानडी भजनाचे बाळकडु मिळाले आणि त्यांच्या पुण्याईने वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन आणि सहवास पंडितजींना लाभला. भारतीय शास्त्रीय संगीतसाधना आणि त्याबरोबर कठोर परिश्रमांची जोड देऊन , पंडितजींनी पुरंदरदासांच्या अभंगावर लक्ष केंद्रित केले आणि अभंगामध्येच नवंनवीन रंग भरले. आपल्या कर्नाटक आणि महाराष्ट्राची थोर परंपरा म्हणजे समस्त मराठी-कानडी संतांची अभंगवाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने सूर, लय, ताल आणि शब्दांच्या सामर्थ्याच्या जोरावर भक्तिरसात चिंब ओथंबवून, घराघरात पोहोचवली.
प्रत्यक्षात मला कधी त्यांचं गाणं ऐकायचं भाग्य लाभलं नाही पण आमच्या पप्पांच्या तितक्याच गोड हार्मोनियम आणि व्हायोलिन च्या कर्णमधुर स्वरांनी ही उणीव भरून काढली. पपा गोवेकरांमुळेच लहानपणापासून भीमसेनजींचे अद्वितीय सूर कानावर पडले. अश्या गाण्यांची, भजनं-अभंगांची ओळख झाली आणि आम्हा भावंडांवर त्यांच्या संगीताचे संस्कार झाले. .... आज कितीही वेळा ही गाणी, भजनं ऐकली तरी मन भरत नाही...
विशिष्ट संगीत घराण्याच्या चौकटी बाहेर पडून, संगीतातील सगळी सौंदर्य स्थळं गोळा करून आपली गायकी श्रीमंत करणारे हे एक प्रख्यात जेष्ठ कलाकार !
विशिष्ट संगीत घराण्याच्या चौकटी बाहेर पडून, संगीतातील सगळी सौंदर्य स्थळं गोळा करून आपली गायकी श्रीमंत करणारे हे एक प्रख्यात जेष्ठ कलाकार !

पहाटे उठून योगाभ्यास करत आणि नंतर त्यांची संगीत-साधना सुरु होत असे. आम्हा सगळ्यांची दिवसाची सुरुवात पंडितजींच्या अभंग, भजनाने होत असे. पं. भीमसेन जोशी, श्रीनिवास खळे (खळे काका) , भारतरत्न बिस्मिल्लाह खान साहेब ह्या सगळ्या दिग्गज मंडळींच्या अभंग-भजनाच्या, शहनाई वादनाच्या कॅसेट्स, सीडीज 'पपा लावत असत आणि अगदी तल्लीन होऊन तासंतास हार्मोनियम वर त्यांच्या गाण्यांना साथ देत असत. ह्या सगळ्याच उस्ताद मंडळींच्या कलाविष्काराने, आमच्या घरात एक वेगळंच प्रसन्न, मंगलमय वातावरण असे.
गेल्या आठवड्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या "आलाप" ह्या प्रकाराची माहिती इंटरनेट वाचता वाचता, भीमसेनजींच्या एकूण संगीत प्रवासाच्या माहितीची ज्ञानात भर पडली. त्यांचा तासंतास चालणारा रियाज, संगीताचे वेड-ध्यास-छंद , अशक्यातून शक्य करायची जिद्द वगैरे. संगीत हा त्यांचा पाहिला छंद तर कार ड्रायविंग हा दुसरा. आधी सायकल , मग मोटार सायकल आणि मग "कार" स्वतः चालवायला त्यांना फार आवडत असे. त्यांच्याप्रमाणे पंडितजींना विविध खेळांची, व्यायामाची देखील खूप आवड होती. फ़ुटबाँल त्यांचा आवडीचा खेळ असून ते डिस्ट्रिक्ट लेव्हला फुटबॉल खेळायचे. "मिले सूर मेरा तुम्हारा " ह्या राष्ट्रभक्तीपर गीतामुळे पंडितजींनी अख्या भारत आणि समस्त भारतवासीयांची मनें जिंकली.
वयाच्या १०/११ वर्षांपासून घरातून पळून जाऊन, पंडितजींनी अब्दुल करीम खान यांच्या रेकॉर्डसनी प्रभावित होऊन संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचा संगीत प्रवास सुरु झाला. भीमसेन जोशींना इ.स. १९७२साली "पद्मश्री" पुरस्कार, इ.स. १९७६ साली "संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार" , इ.स. १९८५ साली "पद्मभूषण " या पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने त्यांना संगीताचार्य ही पदवी दिली. पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डी. लिट्. ही पदवी दिली. इतर पुरस्कारांमध्ये पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ने सन्मानित केले आहे.
पं. भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा "भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार" देते. आतापर्यंत हा पुरस्कार किशोरी आमोणकर, पंडित जसराज यांना मिळाला आहे. पुणे महानगरपालिका दरवर्षी भीमसेन जोशींच्या जन्मदिनी म्हणजे ४ फेब्रुवारीला त्यांच्या स्मरणार्थ, स्वरभास्कर पुरस्कार या नावाचा पुरस्कार देते. पहिल्या वर्षी हा पुरस्कार लता मंगेशकर यांना, दुसऱ्या वर्षी बिरजू महाराज यांना आणि तिसऱ्या वर्षी शिवकुमार शर्मा यांना देण्यात आला. ४थ्या वर्षीचा, म्हणजे ४-२-२०१४ ला देय असलेला पुरस्कार २२-२-२०१४ पर्यंत जाहीर झालेला नाही. या पुरस्कारासोबतच तीन दिवसांचा संगीत महोत्सवही असतो. १,११,१११ रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भीमसेन जोशींच्या पत्नीच्या नावाने ’वत्सलाबाई जोशी’ पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार एके वर्षी अजय पोहनकर यांना मिळाला आहे. असो. त्यांच्या आतापर्यंतच्या भारतीय शास्त्रीय संगीतसेवेमुळे अजरामर स्थान असलेल्या भीमसेनजींची बद्दल आदर तर होताच, पण तो आणखीनच वाढला, द्विगुणित झाला, अभिमानाने उर भरून आलं. आणि नकळत ह्या कलेच्या पुजाऱ्याला अभिवादन करण्यास हात जोडले गेले..
आज पंडितजींच्या वाढदिवसादिवशी, पुन्हा एकदा जुन्या, बालपणीच्या आठवणीं ताज्या झाल्या. आज इतकया वर्षांनंतर, माझ्या माहितीनुसार किमान ३०-४०+वर्षांपूर्वीच्या किंवा त्याहीपेक्षा आधीच्या त्यांच्या काही अजरामर रचना, बंदिशी आणि अभंग.ऐकतांना, भीमसेनजींच्या माझे माहेर पंढरी ..... जो भजे हरी को सदा, कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे , चलो री मुराली सुनीये, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, मधुकर श्याम हमारे चोर, ये तनु मुंडेंना वे मुडेंना .... या अश्या अनेक भजनांतील टाळ, मृदूंग, पखवाज पुन्हा एकदा कानांत दुमदुमला आणि डोळ्यातल्या अश्रूंच्या धारांना वाट करून देण्या शिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही. प्रत्येक भजनाची, अभंगाची एक वेगळीच अवर्णनीय, अवीट गोडी आणि माधुर्य...

सौ. सरोज प्रशांत जावकर
4th February 2018
No comments:
Post a Comment