Tuesday, January 23, 2018

आठवणीतील बालपण ...

आठवणीतील बालपण ....

काय मग ?   सुटलं ना तोंडाला पाणी ? लहानपणी  शाळेत असतांना रबर-पेन्सिली आणि बाकावर वरून होणाऱ्या महायुद्धानंवरचा एकमेव रामबाण उपायप्रसंगी कट्टी-बट्टी वर आधारित, मोठे मोठे राजकीय डावपेच सोडविण्यात हीचा विशेष हातखंडात्यातल्या त्यात लिम्लेट अँड जिरा गोळी पेक्षा किंचितशी उजवी आणि जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळणारी .. माझी लाडकी बाल-मैत्रीण.. श्रीखंडाची वडी ...!!
गेल्या महिन्यातलीच गोष्ट, शिवाजी पार्कच्या छेडा ब्रदर्स कडे खरेदी करत असतांना खूप वर्षांनी ह्या वडीच्या पाकिटावर अचानक नजर पडली …..

मला अजुनही आठवतं.. लहानपणी पप्पांचा हात धरून दादर टी.टी ला संध्याकाळी फेरफटका मारायला, खरेदीला निघालो की माझी हमखास ठरलेली डिमांड ...पप्पा ..श्रीखंडाची वाडी ..शेंडेफळ असल्याने सहसा माझ्या मागण्या नाकारल्या जात नसतहिंदू कॉलनी च्या पहिल्या गल्लीच्या कोपऱ्यावरच्या , बी.सी स्टोअर्स मधून ही मोठी खरेदी झाली रे झाली की ….दिल एकदम खुश... !!!

ठरल्या प्रमाणे दोन-तीन  आठवड्यानंतरची परत  सामानाची बांधा-बांध ..दिवसेंदिवस थकत चाललेल्या, आई आणि आई-पप्पांना(सासू -सासऱ्यांना) परत एकटं सोडून जायची वेळ जवळ येत होती ...एका बॅगेत अगदी आपली पॅकिंग Skills पणाला लावून, संसारातल्या मोहाला बाळी पडून जमा केलेलं सामान कोंबताना होणारी माझी धांदल बघून, ही  माझी " चड्डी-बड्डी", माझ्या हॅन्डबॅग च्या कोपऱ्यातून हसत हसत, हलकेच न्याहाळत असल्याचं मला  जाणवलं ..कोणीतरी माझ्याशी बोलतंय असं वाटलं ...तेव्हा या माझ्या BFF ने  मारलेल्या या कविता रुपी गप्पाकवितेचे लेखक/लेखिका कोण ? ते माहित नाही पण माझ्या मनातला कल्लोळ यातुन नक्कीच व्यक्त होतोय असं मला वाटतं.......

असं वाटतं कशाला आलं हे तरुणपण , कुणी तरी परत द्या मला माझं बालपण ...
फार आठवते,
हा घास चिऊचा, हा घास काऊचा करत भरवणारी ती आईची माया
सायकल शिकवताना मागे मागे धावणारी ती बाबांची छाया

दगड मातीने प्रत्येक दिवाळीत बांधलेले ते शिवाजीचे अभेद्य किल्ले
जमा केलेले ते ड्युक्स आणि गोल्डस्पोट कोल्डड्रिंकचे इवलेशे बिल्ले

धुरांच्या रेषा हवेत काढीत मामाच्या गावाला नेणारी ती झुकझुक गाडी
क्रिसमसला सॉक्स मध्ये चॉकलेट ठेवून जाणारी सांताक्लोजची ती सफेद दाढी

तीन चार टप्पे पाडत पाण्यावर फेकलेली ती चपट्या दगडाची टप टप
पाय आपटत पावसाळ्यात काढलेली ती काळ्या गमबूटाची चप चप

भयाण वाटणारा तो पायथागोरस थिओरेम आणि ती गणिताची वही   
घाबरत घाबरत प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची ती खोटी सही

अवघड गेलेलं ते संदर्बासह स्पष्टीकरण आणि इंग्रजीतलं व्याकरण
खेळात आउट होत असता टाइमप्लीज ओरडत केलेलं ते राजकारण

पार्कमधील आकाशाला भिडणारा तो झोका आणि पत्र्याची ती घसरगुंडी
लवकर झोपलं नाही तर बागुलबुवाच्या धाकाने उडलेली ती घाबरगुंडी

बाईंच्या हातातली रप रप लागणारी ती वेताची छडी
पहिल्या चेंडूत आउट होताच  ट्रायलबॉल  म्हणत केलेली ती क्रिकेट मधील रडी

दर रविवारी सकाळी भेटणारा तो मोगली आणि दूरदर्शनवरील ते छायागीत
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? हे तोंडपाट असलेलं ते बडबडगीत

खरंच, कशाला आलं हे तरुणपण
हरवलं त्यात मी माझं निरागस बालपण....


My all-time favorite  - श्रीखंडाची वडी....आपल्या सगळ्यांचीच लाडकी देशी Chill Pill…Do you agree?

आपली सौ.सरोज प्रशांत जावकर.
21st Feb 2017



No comments:

Post a Comment