Saturday, November 30, 2019

स्वकमाई ..


अशी माझी अमेरिका - बघता बघता तेवीस वर्ष झाली अमेरिकेत येऊन ..! 
इकडे नवीन असताना ऑफिस मधल्या एका अमेरिकन जोडप्याशी ओळख झाली, मैत्री वाढली. एका संध्याकाळी आम्ही सगळे बाहेर फिरायला गेलो असतांना,  त्या मित्राच्या बायकोने सांगितलं की I buy groceries and he takes care of the bills... अर्थात माझ्या "स्वदेशी"  कानांना ह्या सगळ्या प्रकाराची अजून सवय झाली नसल्याने, मला हा प्रकार पचनी पडायला थोडासा वेळ लागला होता. वर्षामागून वर्षे भराभर सरली. पुढे आम्ही उभयंता पण  घर संसार- मुलंबाळ आणि आपआपल्या व्यापात रमलो. कालपरत्वे, ह्या अमेरिकन जीवनाची सवय तर झालीच आणि इथल्या सगळ्या पद्धती हळुहळू अंगवळणी पडल्या. असो. 

खरं तर ह्या देशात मुलं-मुली तरुण वयातच स्वतंत्र होऊन, घराबाहेर पडून आपल्या अश्या वेगळ्याच विश्वात रमतात. स्वतःच्या सर्व आर्थिक, सामाजिक जबाबदाऱ्या स्वतःच पेलायला सज्ज होतात. हा एक काहीसा आवडलेला, तेवढाच काहीसा न-रुचलेला अमेरिकन संस्कृतीचा एक अतिशय महत्वाचा पैलू....! कधी कौटुंबिक परिस्थिती मुळे तर कधी आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांची ओळख व्हावी, घराबाहेरच्या दुनियेशी संपर्क असावा, व्यावसायिक शिस्तीचे पालन ह्या महत्वाच्या गोष्टी ही मुलं खूप लवकर शिकतात. आणि हि एक खूप मोठी जमेची बाजू आहे असं मला खूप मनापासुन वाटतं.  पण इथली एकंदरीत स्वैर जीवन शैली, घटस्फोटांचे वाढते, विवाहबंधना विषयीच्या काहीश्या वेगळ्या कल्पना, ह्या सगळ्याचे पडसाद भावी पिढीवर नक्कीच  उमटतात, परिणामी जन्मदात्यांच्या मार्गदर्शना अभावी ही तरुण  मुलं -मुली, ह्या सगळ्या संसारीक रगाड्यात नक्कीच भरडली जातात.  म्हणून म्हंटल मला काही अंशी न-रुचलेला ... ! असो हा एक गहन आणि खूप मोठा वादाचा मुद्दा आहे, त्याविषयी नंतर कधीतरी ...असो. 

अमेरिकेत जन्मलेली, वाढलेली आज आमची मुलं देखील म्हणजे  - कन्यारत्न कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात आहे चिरंजीव शाळा, हायस्कूल संपवून आता कॉलेजला जायच्या तयारीत आहेत. त्यामुळे नुकत्याच संपलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत "Summer Jobs" करणं हे ओघाओघाने आलंच. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या दोन्ही मुलांनी, त्यांच्या आयुष्यातले पहिले "Summer jobs"  केले. त्यांच्या तोंडून पे-चेक, ट्रॅफिक जॅम वगैरे शब्द ऐकून खूप मजा वाटली, अभिमान वाटला आणि एक वेगळ्याच प्रकारचं दडपण ही आलं. अगदी काल परवा पर्यंत आपल्यावर सर्वस्वी अवलंबून असणारी हि पाखरं, आता एकाएकी बँक बॅलन्स, क्रेडीट कार्ड, इन्शुरन्स आणि गॅस प्राईज च्या गप्पा मारायला लागली. आणि अगदी प्रकर्षाने जाणवलं, भूमिका बदलत आहेत, पण त्यात वेगळी मजा आहे...समाधान आहे !

आपल्या दीड दोन महिन्यांच्या  छोट्याश्या का होईना, पण "पहिल्यावहिल्या" स्वकमाईतून आम्हाला दिलेली पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगाराची डिनर-पार्टी, आमच्या वाढदिवसा दिवशी स्वतःहून आणलेल्या "भेटवस्तु", आपल्या लाडक्या, छोट्या दोस्ताला - आणि त्यांच्या लहानग्या मैत्रिणीला त्यांच्या वाढदिसानिमित्त दिलेली छोटीशी "Ice Cream" ची पार्टी ....या सगळ्यात एक वेगळाच आनंद आहे. आणि अगदी प्रकर्षाने जाणवलं, भूमिका बदलत आहेत, आणि त्यात वेगळी मजा आहे...भूमिका बदलल्याचं अप्रूप आहे! 

आता नवीन जॉब, नवीन गोष्टी शिकण, ठरल्या वेळात सगळी काम पटापट उरकण हे दिवसभर चालू होतंच. आणि मजा म्हणजे दर आठवड्याला गाडीत गॅस भरताना, संध्याकाळी त्यांच्या ह्या नवीन ऑफिसमधून दमुन भागून घरी परतल्यावर स्वतः किचन मध्ये किंवा यार्ड वर्क मध्ये हातभार लावतानाच्या टंगळ मंगळीने प्रसंगी चांगलचं डोकं फिरलं पण हि लुटूपुटूची प्रासंगिक वादावादी पण सुखावून गेली. आपल्या आई-वडिलांची रोजची होणारी कामाची गडबड, धावपळ, धांदल आता त्यांना स्वतः अनुभवतांना अगदी प्रकर्षाने जाणवलं, भूमिका बदलत आहेत, आणि त्यात वेगळी मजा आहे...भूमिका बदलल्याचं समाधान आहे! 

 एकीकडे डिझाइनर आणि ब्रँडेड गोष्टींच्या मायावी दुनियेत हरवलेल्या ह्या तरुण पिढीला, स्वकमाईतला थोड्या  हिश्याची बचत करण्याचे फंडे देतांना,  त्यांच्या असंख्य... Why? च्या  प्रश्नांची उत्तरं देता देता झालेल्या दमछाकीत, एक वेगळीच मस्त मजा आहे...भूमिका बदल्याच बदलल्याचं अप्रूप आहे! असो.             

तर मंडळी, विधात्याने ह्या पिल्लांच्या ताटात काय वाढून ठेवलं आहे, माहित नाही पण जे काही असेल ते सहन रायची शक्ती दे. प्रगतीचे पंख फैलावत, आकाशात उंच भरारी मारण्यास उत्सुक असलेल्या ह्या पिल्लांच्या पंखात बळ दे, देवाकडे अशी प्रार्थना जगातल्या  प्रत्येक पालकांची  असते ..आमची हि आहे. 
 
अश्या माझ्या अमेरिकेत, भूमिका बदलण्या बद्दल यापूर्वी अनेकदा वाचनात आलं होतं पण आता प्रत्यक्षात अनुभवायची मजा काही औरचं आहे ..!

सरोज प्रशांत जावकर 
मी मराठी ...
10 OCT 2019

No comments:

Post a Comment