Sunday, December 1, 2019

दही वडा स्पेशल ...नाही "स्पेशल" दही वडा!


इंडियन रेस्टॉरंट मध्ये गेलं की दहीवडा आणि रवा-साधा डोसा मागवल्याशिवाय जावकर कुटुंबीयांचं पानच हालत नाही मुळी ... नाही म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेला तसा रिवाजच आहे म्हणा ... 
काही दिवसांपूर्वी आम्ही एका हॉटेलात गेलो होतो आणि नेहेमीप्रमाणे दहीवडा मागवला.  पण ते वेटर काका,दहीवड्याचं नाव ऐकल्यावर एकदम हरवल्या सारखे काही सेंकंद शून्यात नजर लावून आमच्यकडे बघायला लागले. आम्हाला कळेना हॉटेलमधल्या, ह्या अनुभवी वेटर काकांना दही वड्याच्या नावाने एवढी कसली भुरळ पडावी?.. असो. 

बऱ्याच अवधी नंतर ते एक दह्याने तुडुंब भरलेला एक वाडगा (bowl ) सांभाळत सांभाळत घेऊन आले. त्या वाडग्यातल्या दह्याच्या  डोंगरावर तिखट आणि गोड चटण्यांना अगदी उधाण आलं होतं. आम्ही मनांत म्हंटलं, आज chef बाबा चांगल्या मूड मध्ये असावेत कदाचित.   मग "वल्हव रे नकवा...हो वल्हव रे रामा..... " म्हणत म्हणत, आम्ही त्या दह्याच्या पूरग्रस्त परिस्थितीतून वाट काढीत, हळुहळू त्या वड्यापर्यंत पोहोचल्यावर, मघाशी पडलेल्या त्या वेटर काकांच्या भुरळीचं रहस्य आणि त्यांच्या हरवलेल्या नजरेचा खुलासा झाला एकदाचा.. !

 त्या वाडग्यात चक्क "मेदुवडा" बुचकळलेला होता. आणि तो छानसा गुटगुटीत + गोंडस मेदुवडा, साक्षात दधि समवेत दुग्धशर्करायुक्त तिखटगोड चटणी मिश्रणात अगदी मुक्त पणे - "free style" swimming करत होता. आणि ते Workaround expert वेटर काका, काही क्षण नक्की का चक्रावले होते?, ते आता आमच्या चांगलच ध्यानात आलं होतं .... असो ! 

आता "चिनी कम" मध्यल्या तब्बूच्या हैद्राबादी बिर्याणी सारखं मी केलेला दहीवडा त्या वेटरकाकांना खिलवावा का ? ह्या विचारात मी आहे ...जाऊ दे.नाहीतर ..दहीवडा भलताच 
 महागात पडायचा मला..... !

सरोज प्रशांत जावकर 
मी मराठी ..

No comments:

Post a Comment