Sunday, December 1, 2019

ऋणानुबंधाच्या रेशीमगाठी ......


सनई-चौघड्याचे मंगल सूर, हलकेच दरवळणारा फुलांचा मंद सुवास आणि लखलखीत दिव्यांची रोषणाई... झगमगीत प्रकाशातले लेटेस्ट फॅशनचे नवीन चकचकीत दागिने, शरारे- शेरवान्या, चंदेरी- कांजीवरम-पैठण्यांची ही यथेच्छ रेलचेल. आनंदाला अगदी उधाण आलेलं. यंदाच्या भारत दौऱ्यात, घरच्याच एका लग्न सोहळ्यात, सामील व्हायचा छान योग आला....!
नातेवाईक, पाहुण्यांची वर्दळ, ठरलेली ये-जा आणि सगळीकडे मजा-मस्करीला अगदी भरपूर ऊत आलेला. सगळेच उल्हसित -प्रफुल्लित चेहेरे. मेहेंदी, संगीत, हळद , पुण्यवचन अश्या एकामागोमाग कार्यक्रमांची रीघ लागलेली.. एकीकडे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या मुलीची सासरी पाठवणी करतांना होणारी, एका आईच्या हृदयाची घालमेल आणि दुसरीकडे एक प्रकारचं चेहऱ्यावरच अलौकिक, आत्मिक समाधान - आपली चिमुकली शिकून-सवरून, स्वतःच्या पायावर उभी असल्याचं! आज अमेरिकेसारख्या प्रगत देशात जाऊन स्वतःच्या हुशारीवर आणि स्वकष्टाच्या जोरावर आपलं अस्तित्व, आपलं स्थान प्रस्थापित केल्याचं...स्वतःसाठी साठी सुयोग्य जोडीदार शोधल्याचं..... जावयाच्या रूपात मुलगाच मिळाल्याचं!
आता "लग्न " म्हणजे प्रत्येक मुलीच्या-स्त्री च्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा, आनंदाचा क्षण आणि या आनंदाच्या सोहळ्यात सामील होणारी प्रत्येक व्यक्ती, मग ती घरातली असो का बाहेरची? .. प्रसंगाशी इतकी समरस होते, कुठेतरी ऋणानुबंधाच्या गाठी बांधून जाते, याची छान प्रचिती वेळोवेळी या लग्नात आली.
नवरीच्या आजी सह एक सोडून तीन-तीन मावश्यांनी या लग्नाला हजेरी लावली होती आणि सगळ्याच जणी पदर खोचून नकटीच्या लग्नाला तयार होत्या. या दरम्यान काही नवीन ओळखी झाल्या, नवीन मित्र-मैत्रिणी जोडायची संधी मिळाली. आणि काही माणसं तर कायमची मनात घरं करून गेली. असंच एक, ह्या लग्नघरा शेजारचं जोडपं - रोनक आणि क्रिना जसानी. यापूर्वी कधीही न भेटलेल्या ह्या दोघांनी, आम्हा सगळ्या पाहुण्यांची एवढी मनापासून बडदास्त ठेवली, कि विचारता सोया नाही. अगदी आत्ता आत्ता पर्यंत अनोळखी असलेल्या ह्या दोघांनी, विशेषतः माझ्या आईची (वय वर्षे ८०) अगदी हाताला धरून, वेळोवेळी काळजी घेतली. काही हवं नको याकडे जातीने लक्ष दिलं. स्वतः डायमंड व्यापारी असलेला रोनक, ह्या लग्नघरात अगदी हक्काने, सराईतपणे वावरत होता, अगदी पडेल ती कामं अगदी स्वखुशीने पटापट उरकत होता. कुठेही गर्व नाही की पैश्याची घमेंड नाही. तसं बघायला गेलं तर आमच्याशी ह्या दोघांचा काहीच संबंध नाही, पण तरी सुद्धा प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा शिडकावा सातत्याने ह्या अल्पश्या भेटीत खूप जवळून अनुभवायला मिळाला.
अगदी काल-परवा पर्यंत रागाने, हट्टाने गाल फुगवून नाकाचा शेंडा लाल बुंद करून, फुरंगटून बसणारी आईची ही लाडकी बाळी, आज आपला स्वतःचा संसार थाटायला सज्ज होत होती. एका हाताने आपल्या नाकातली नथ, मुंडावळ्या आणि एका हाताने साडी सावरत, आईचा हात धरून बोहल्यावर उभी होती.
हे सगळं अगदी ओळखीचं, परिचीत, स्वानुभवलेलं पण तरीही कुठेतरी हलकेच मनाला घोर लावणारं, नकळत डोळ्यांच्या कडा ओलावणारं...
सौ. सरोज जावकर-गोवेकर
30th Jan 2017
with my lovely big sisters - Reshma Govekar Jadhav, Jyoti Jadhav Govekar, Pooja Prakash and my hubby - Prashant Javkar!!!!!!

No comments:

Post a Comment