Sunday, December 1, 2019

भारत दौरा - टप्पा क्र. २


साधारणतः दोन -चार आठवड्यानंतर सगळी हौस-मौज करून पुन्हा आपलं घर गाठायचे वेध लागलेले.. परतीच्या प्रवासाचा क्षीण-थकवा. एकदा घरांत शिरल्यावर, संमिश्र भावनांनी एकवार सगळीकड़े नजर टाकल्यावर असं जाणवतं की नेहेमीप्रमाणे घरातील काही वस्तू आपआपल्या जागी तटस्थ, एका वेगळ्याच केविलवाण्या मुद्रेने, बापड्यासारख्या उभ्या आहेत... काहींनी अगदी हमखासपणे स्थलांतर करून, आपली सरहद्द पार ओलांडून परप्रांतात जाऊन अगदी हक्काने ठिय्या मंडला आहे .. आपल्या अस्तित्वाची विशेष जाणीव करून दिलेली (म्हणजे पसारा ..... हे नव्याने सांगायची गरज आहे का?... ).  ह्या सगळ्यांची हजेरी घेत घेत, माझा मोर्चा हळूहळू, दबकत दबकत फुलझाडांकडे वळतो. आणि माझ्या डोळ्यांत एक विलक्षण अपराधी भाव उफाळून येतो ......!

पार सुकून राकट झालेली तुळशीची रोपं, बाकीची थोडीफार शोभेची झाडं जेमतेम तग धरून, आला दिवस पुढे रेटत असलेली ... बाहेरचा बर्फ, काही थांबण्याचे काही नाव घेत नाही, त्यामुळे आधीच गारठलेली, जवळजवळ माना टाकलेली, माझी अगदी हाताच्या बोटावर मोजता येणारी पण अत्यंत लाडकी फुलझाडं... "अल्ला को प्यारी" झालेल्या अवस्थेत..... एकूण काय तर आपल्या गैरहजेरीत लागलेली, ह्या चालत्या बोलत्या हिरव्यागार झाडांची वाताहात! भारत दौरा संपवून २/४ आठवड्यांनी घरी परातल्यावरचा हा मानसिक पीडादायी अगदी ठरलेला, नित्यक्रम.........  भारत दौरा - टप्पा क्र. 

सप्टेंबर च्या सुमारास झालेल्या अकाली थंडी आणि डिफ्रॉस्ट मुळे बाहेर पॅटीओ वरचा कडीपत्ता पार गारठून गेला.  आणि बघतां बघतां पटकन त्याच्या फांद्या, पानं पार सुकून-गळून गेली. कामाच्या गडबडीत, यंदा प्रवासाला निघण्यापूर्वी जवळच्या मैत्रिणीकडे माझी झाडं द्यायला विसरले होते.  माझ्या हलगर्जीपणामुळे ते झाड मेलं, याचा मनस्वी राग आला, खूप चीडचीड झाली.  मला अत्यंत वाईट वाटलं .. पण हे झाड खरंच  मेलं असेल का? हे स्वीकारायला काही केल्या, मन धजतच नव्हतं ...आणि ते झाड आता टाकून द्यावं, हे ही करायची हिंमत, त्याहीपेक्षा मन:स्थिती नव्हती....

अगदी खूप जरी नसली माझी तरी मोजकीच ४/५ झाडं - त्यात हलकेच दरवळणारा मोगरा, बाप्पा मोरयाच्या नैवेद्यासाठी नेहेमीच मोठ्या उत्साहाने  दिमाखात सज्ज असलेली केळी, हवा शुद्ध करणारो कोरफड (Aloe Vera), सगळ्यांच्याच आरोग्य-स्वाथ्यासाठी नेहेमीच सतर्क-जागरुक असणारी औषधी तुळस, Peace लीली आणि झालंच तर इकडून-तिकडून झुळझुळणारी एक/दोन मनी प्लांट्स ..हा एवढाच माझ्या झाडांचा गोतावळा पण त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारायला, हितगुज करायला अगदी पुरेसा... !  असं म्हणतात की झाडांशी बोललेलं त्यांना उमगतं.  आपला स्पर्श, आवाज, भावना, ध्वनीलहरी त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याला योग्य तो प्रतिसाद सुद्धा देतात. अर्थात पुरेश्या सूर्यप्रकाश आणि खत-पाण्याबरोबर ही मंडळी प्रेमाची देखील भुकेली असतात. असो. 

बऱ्याच मस्का-पॉलीश नंतर, आमचा जवळचा मित्र संदीप मोरे ह्याने "मारणार नसलीस तरच देईन"  ह्या बोलीवर चांगलं धष्टपुष्ट करून देऊ केलेलं हे कडीपत्त्याचं हे झाड...  हा हा म्हणतां, बाहेरच्या गारठ्याने इतक्या पटकन मरून जाईल ह्यावर विश्वासच बसत न्हवता.  गेल्या दिवाळीला कच्च्या पोह्याच्या चिवड्याची लज्जत, ह्या घरच्या कडीपत्त्याने वाढविली होती... ही नक्कीच एक आत्मसमाधानाची बाब होती. मला पाहिजे म्हंटल्यावर माझी मैत्रीण नीलम कुळकर्णी ने तिच्याकडचा अगदी सहज उचलून दिलेला "मोगरा" .. ह्या झाडांबरोबरच, त्यामागच्या मैत्रीच्या भावना जपणं, हेही तितकंच महत्वाचं ... दरवर्षी मोगरा बहरला की पहिला फ़ोन आणि फोटो न चुकता नीलम आणि आनंदला  पोहोचतात ....असो!

पण यावेळी मला मात्र भारतातून परतल्यावर एक विलक्षण सुखद धक्का बसला .... 
त्या  कडीपत्त्याला चक्क नवीन हिरवीगार, लुसलुशीत पालवी फुटली होती. आणि दोन-तीन छोटी छोटी रोपं मोठ्या दिमाखात माझ्या स्वागताला हसत खेळत तयार होती....... कदाचित मला झालेल्या पश्चातापामुळें, ह्या माझ्या छोट्या दोस्तांनी, माझ्या निष्काळजीपणावर पांघरूण घालून यावेळी दोस्तीमें  "माफ" केलं असेल कदाचित .....आणि एका नव्या उमेदीसह, कुठेतरी नकळत आनंदाने जोरांत शब्द उमटले  .... Spring is in the air..... Spring is in the air !!!


सरोज प्रशांत जावकर 
मी मराठी ..




No comments:

Post a Comment