Tuesday, February 9, 2021

 परी है तू ... !

गेल्या महिन्यात संक्रांतीच्या निमित्ताने काही तिशीतल्या , तर काही चाळीशी उलुटून पन्नाशीची चाहूल लागलेल्या, आम्ही मैत्रिणींनी एका छानश्या नाचात भाग घेतला. भरतनाट्यम, कत्थक चा गंध नसलेल्या माझ्यासारख्याच ह्या "शास्त्रीय नृत्य" विषयात नवख्या, असलेल्या माझ्या सगळ्या जवळच्या आणि अत्यंत हौशी मैत्रिणींनी, ह्या fusion डान्स द्वारे आपली चांगलीच हौस पुरी करून घेतली. अर्थात त्यासाठी मेहनत हि भरपूर घेतली पण प्रत्येकीची इच्छाशक्ती आणि उत्साह दांडगा असल्याने, एक वेगळाच आनंद आम्ही सगळ्याजणींनी अनुभवला. आणि ह्या नृत्य प्रवासात आमच्या मैत्रीची वीण आणखीन घट्ट झाली!


एकीकडे कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू असतांना, नाचासाठी सगळ्यांचे एक सारखे कपडे आणि ज्वेलरी भाड्याने घ्यायचं एकमताने ठरलं. आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी ते घेतले देखील. अर्थात इथे काही ठराविक ठिकाणीच ह्या भारतीय पारंपरिक कपड्यांची सोय असल्याने "पदरी पडलं आणि पवित्र झालं" - हा मार्ग अवलंबिण्याशिवाय गत्यंतर नाही.असो. मळखाऊ डिपार्टमेंटच्या "कळकट्ट - मळकट्ट" शाखेत सर्वतोपरी उच्च पदावर असलेल्या त्या भाडेकरू, डागाळलेल्या, काही अंशी जीर्ण कपड्यांची एकंदरीत "दयनीय" अवस्था बघून मला माझी आईची खूप प्रकर्षाने आठवण झाली ...
मला आठवतं लहानपणी शाळेच्या Annual Day - "वार्षिक संमेलन" - म्हणजे गॅदरींग ची तारीख ठरली.. तशी ती पालकांना कळवली देखील गेली. शाळेच्या वेळेतच त्याच्या प्रॅक्टिसेस सुरु झाल्या. अगदी नक्की आठवत नाही पण, मी पहिली /दुसरीत असेन तेव्हां. प्रत्येक इयत्तेतील आम्हा काही मुलींना ह्या कार्यक्रमात सहभागी ह्यायची संधी मिळाली. आमचाही एक कार्यक्रम ठरला. ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना एक सारखे असे सफेद फ्रॉक आणि पांढरे पायमोजे शाळेतूनच पुरविण्यात येणार असल्याचं कळलं. त्यामुळे वेगळ्या खरेदीची काहीच विशेष आवश्यकता नव्हती...
ठरल्या प्रमाणे, कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी शाळेतल्या बाईंनी सगळ्या मुलींना ते ड्रेस देऊ केले. ठेवणीतल्या त्या कपड्यांना, वर्षातून एकदाच उन्ह लागत असावी होती बहुतेक. शाळेचे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आटोपल्यावर पुन्हा ते सगळे ड्रेस, आपले शाळेच्या स्टोरेज मधल्या पेटीत बंदिस्त! असो. आता स्टेजवर जायची उत्कंठा तर होतीच, पण त्या कोवळ्या, निरागस वयात भीती, stage -fright सारखे फंडे अजिबात आसपासहि भटकत नाहीत ... (पण आता मात्र चार लोकांसमोर बोलायचं, नाचायचं म्हणजे दरदरून घाम फुटतो.) असो.
तेव्हा फारशी जाण नसल्याने, बाईंनी दिलेला तो फ्रॉक घेऊन अगदी आनंदाने, उड्या मारत मारत घरी आले . कधी एकदा तो ड्रेस घालते आणि स्टेजवर जाते असं मला झालं होतं. मेकअप आणि लीप-स्टीक लावायला मिळणार ह्या कल्पनेनं सुद्धा माझ्या बालमानाचा आनंद गगनात मावत नव्हता ...
संध्याकाळी आई ऑफिसमधून परतली तेंव्हा, अगदी नाचत नाचत मी तो फ्रॉक दप्तरातून काढून आईला दाखवला. माझ्या आनंदात, ती पण सामील झाली लगेच पण तो जुना डागाळलेला, ठेवणीतला मळका ड्रेस बघून मनातून मात्र नक्कीच खट्टू झाली. अर्थात मला त्याचा थांगपत्ताही लागू नं देता, तिने तो तसाच व्यवस्थित घडी करून होता तसा परत ठेवून दिला. पण माझ्या वाटणीला आलेल्या ड्रेसचा एकूण अवतार बघून, तिला काही करमेना. त्या संध्याकाळी जेवण झाली, आम्ही भावंड झोपी गेलो पण माझ्या आईचा मात्र काही केल्या डोळा लागेना. एवढा "कळकट्ट" ड्रेस घालून मी स्टेजवर जाणार, हे तिला अजिबातच रुचलं नाही. पण कार्यक्रम तर अगदी तोंडावर आला होता. आता काय करायचं ? आणि ठरलं. म्हणजे तिने मनांत आणलं ..... आणि ठरवलं ..!
तेव्हा फुल टाईम जॉब करणाऱ्या माझ्या आईने, दुसऱ्यादिवशी ऑफिस मधून डायरेक्ट बाजारात जाऊन शिफ्फॉन च पांढर शुभ्र कापड आणून एका रात्रीत माझ्यासाठी रात्रभर जागून, एकदम मस्त, फ्रीलवाला फुग्र्या हातांचा ...एकदम कडक ..... नवीन कोरा, पांढरा शुभ्र ड्रेस शिवून दिला. सोबत "बाटा" चे पांढरे पायमोजे आणायला, देखील ती विसरली नव्हती. त्याची बटणं, हेमपट्टी सगळं मन लावून रात्रभर जागून माझ्यासाठी "नवीन" फ्रॉक माझ्या त्या जुन्या फ्रॉक च्या जागी ठेवून, ती दुसऱ्या दिवशी ठरल्या वेळेत कामावर, तीच्या ड्युटीवर रुजू होती.....
आणि आजहि इतक्या वर्षांनी त्या सुखद "श्वेत" आठवणींनीं डोळे नकळत पाणावतात




...फाल्गुनी पाठक च्या "परी हू मै" ऐवजी माझ्यासाठी माझ्या जन्मापासून ते आजतागायत ....भारतकाम, विणकाम, शिवणकाम, पेन्टिंग, मराठी, संस्कृत भाषांत पारंगत, नेहेमीच अडल्या-नडलेल्यांच्या मदतीला सदैव तत्पर असणारी, सुशिक्षित... स्वावलंबी स्वयंसिद्धा ... "परी है तू " ..... Love you aai .....You are my hero ... you are my "परी ".. !
सरोज प्रशांत जावकर
मी मराठी .. 🙏🙏
15th Feb 2020






3 comments:

  1. खरंच ...आई ती आई...बालपण आठवलं

    ReplyDelete
  2. Such a great... Kahi shabdach nighat nahit pudhe. Hats of you

    ReplyDelete