Wednesday, January 25, 2017

एक कप इंडो-अमेरिकन चहा - शाप की वरदान ?




 wah





ताजमहाल च्या नयनरम्यमनमोहक सान्निध्यात – झाकीर भाईंचं सुमधुर तबलावादन. जादूची कांडी फिरवल्यासारखी तबल्यावर लयबद्ध पण मुक्तसंचार करणारी त्यांची बोटं, कपाळावर ओघळलेले कुरळे-कुरळे केस, तालाच्या समेवर दिलेला मानेचा हिसका आणि अवखळ दाद, गरमा-गरम वाफाळलेला चहा- अरे हुजूर... वाह ताज बोलिये!  Simply marvelous ...सगळं कसं अगदी..To die for!

ही 80's -90's मधली ताज चहाची Ad बघत आपण सगळे मोठे झालो. लहानपणी सकाळी दुध, नाश्ता करून शाळेत जायचं. हा आपला सर्व सामान्य रिवाज, नंतर हळुहळु जशी शिंगे फुटायला लागली तेंव्हा मग चहाची चटक लागली आणि माझ्या चहापानाची सुरुवात झाली. 

आमच्या घरी पप्पांना(गोवेकर) सारखा पाच, पाच मिनिटांनी चहा लागायचा. क्रिकेटवाले सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर(हिंदू कॉलनी, दादरचे असल्याने, हे दोघे आउट झाल्यावर विशेष हळहळ) ,कपिल देव आणि बॅडमिंटन वाले लाडके खेळाडू प्रकाश पदुकोण, सय्यद मोदी ,अमिता कुलकर्णी, हुफ्रिश नरिमन खेळायला आले की आमच्या घरी जणु चहाचा पूरच येत असे. मग पुढे अमेरिकेत आल्यावर मात्र हे स्वप्नचित्र पार बदलत गेलं. नव्याची नवलाई अजून संपली नव्हती. इथे लग्न होऊन आलेली मी, माहेरी "अस्सल मासे खाऊ" अशी माझी ख्याती. माझे पप्पा मला नेहमी चिडवत असत, कि हीला कोळी नवराच शोधावा लागणार बहुतेक ! असो. सांगायचा मुद्दा म्हणजे मला रात्री हमखास तीन/चार गोष्टींची स्वप्ने पडत असत - तळलेले मासे, पाणी-पुरी, मलाई कुल्फी आणि मस्त कटिंग चहा ....आत्ताच १५ डिसेंबर ला जागतिक चहा दिन साजरा केला गेला. तेंव्हा द्वारकानाथ संजगिरी'चा चहावर एक छान लेख वाचनात आला आणि काही जुन्या आठवणीं जाग्या झाल्या ..त्यांच्यात उल्लेख केलेल्या ह्या ओळी,  


“चाय चतुर्भज कप नारायणा.......बशी प्रभू की माया" 

फुक मारकर जो पिया वो,........अडसठ तीर्थ नहाया ||

आज बऱ्याच वर्षानंतर अजूनही हा प्रसंग आठवला की मला खूपच  मजा वाटते. नवीन लग्न होऊन अमेरिकेत आल्यावर, आमच्या एका ओळखीच्या बाईंनीं आम्हाला एकदा चहाला बोलवलं होतं. ठरल्या वेळेप्रमाणे कधी नव्हे ते, आम्ही अगदी टायमात त्यांच्या घरी टपकलो. छान चकचकीत कपाटात ठेवलेल्या खूपच व्यवस्थित रचून ठेवलेल काचेचं सामान - कप-बश्या, डिनर सेट्स - China Cabinet  एकदम दिल "खूष" करून गेलं. बराच वेळ अगदी मनसोक्त गप्पा झाल्या - तुम्ही कुठचे- आम्ही कुठचे? आमची शिक्षणं, नॊकरी-व्यवसाय, कुठची गाडी चालवतो? भारतातील वास्तव्य, घरच्यांची सासर-माहेरची विचारपूस --- ते पार ---भारतातील असंख्य, वाढत्या समस्या...भाई भगतांच्या आर्जवी, करुणामय स्वरातली महागाई ची कारणे - म्हणजे - "याला कारण..... भारतातील महागाई, रोगराई,    अस्वच्छता आणि वाढती लोकसंख्या....वगैरे वगैरे ... असो.

बराच वेळ झाला तरी बाई चहाचं जाम नावच काढत नव्हत्या.  मग त्यांच्या "अहों" च्या  तिरप्या square-कट ने, नाईलाजाने शेवटी त्यांनी एकदाच आम्हाला विचारलं – तुम्ही चहा घेणार की कॉफी?  मी लगेचच, एका क्षणाचा ही विलंब न करता आणि आमच्या "अहों"च्या -प्रशांत च्या उत्तराची अजिबात वाट न बघता, जोरात मोठ्याने जाहीर करून टाकलं ---चहा....! तेव्हां त्या म्हणाल्या की आम्ही एकदाच सकाळी कॉफी पितो.  मी मनात म्हटलं "हो का?  आम्ही तर मुंबईत चहा अगदी पाण्यासारखा पितो". (हा अमेरिकन शिष्टाचार, थोड्या उशिरा का होईना, पण माझ्या लक्षात आला.)  आता आमच्यासाठी चहा करावा लागणार, ह्या विवंचनेने बाई एवढ्या त्रासल्या, कि जणुकाही १०० लोकांचा जेवणाचा स्वयंपाक  करून आणते, असे चेहऱ्यावर भाव करत, अतिशय त्रासिक मुद्रेने त्यांनी एकदाचं किचनकडे महत-प्रयासानें प्रस्थान केलं. आणि मग जो काही प्रश्नांचा भडीमार सुरु झाला की क्षणभर असं वाटलं, देवा  (असशील तिकडून)  ....उठा ले..उठा ले...उठा ले रं.. बाबा!

चहा "Dip -Dip" चा घेणार की रेग्युलर? आता हे "Dip -Dip" प्रकरण मला नवीनच होतं. लहानपणी पकडा-पकडी किंवा लपा-छपी खेळतांना "राज्य" घेऊन सुटायच्या वेळी आम्ही "Dip Dip Dip My  Blue Ship" म्हणत असू. त्याचा आणि इथे, चहाशी काय संबंध तेव्हा हे माझ्या बाल-बुद्धीच्या, आवाक्या बाहेरचं होतं.  मग त्यांनी "Dip -Dip" चा खुलासा केला. म्हणजे T-बॅग गरम कडकडीत पाण्यात बुचकळवुन केलेला चहा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आधी पाणी उकळा, मग बाकी चे सगळे जिन्नस घाला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगली "स्वच्छ" गाळणी शोधा...ह्या सगळ्या कामांना दिलेली "रॉयल टांग"...- म्हणजे थोडक्यात  "शॉर्ट-कट" मारलेला चहा. जिथे बाकीच्या अनाठायी कामांची भानगडच नाही. असो.

मला नेहेमीच हा प्रश्न सतावतोजर का मस्तपैकी पंचतारांकित हॉटेल मध्ये समजा कधी चुकून चहा प्यायचा योग आला, तर अर्ध काम आपणच करतो, नाही का?  म्हणजे एकदम पॉश चांदीच्या कप-बशीत गरम पाणी किटलीतून न सांडता ओतायचं, मग क्रमाने दूध, साखर, T-बॅग घालायची, मग तो स्वतःच  ढवळून प्यायचा. तो पर्यंत तो अगदी गार ढोण झालेला, पांचट चहा, उगाचच भुरक्या मारत - त्या सुद्धा बेताने , हळू आवाजात, Fivestar चे etiquettes सांभाळत प्यायचा आणि बिल मात्र  ....Rs .450 म्हणजे तिकडेच भोवळ येऊन, जमिनीवर दणकन आपटून, स्वस्तात दात पाडून घ्यायची एकदम घरगुती "मस्त" सोय. थोड्क्यात म्हणजे मानसिक पीडा...."सबहू कलेस विकार". असो.

मग हे "Dip -Dip" प्रकरण माझ्या ध्यानांत आल्यावर, त्यांना म्हंटल ...नाही ..नको ...मी आपला नॉर्मल च  चहा घेईन. मी पण भारीच चिवट. ...आता "नॉर्मल" हा शब्द प्रयोग, त्यांना फारसा रुचला नसावा बहुतेक. म्हणजे आम्ही काय "अब-नॉर्मल" चहा पितो की काय? असा एक प्रश्नार्थक मुद्रेने, टाकलेला एक  जळजळीत कटाक्ष....आणि त्यांचे आत्यंतिक भावुक, बोलके डोळे, मला बरच काही सांगून गेले. मग शेवटी, एकदाच कसबसं चहाच आधण ठेवलं. मग चहा पावडर (नशीब....माझी पुण्याई की दैवी चमत्कार? ...चक्क मला त्यांनी विचारलं "नाही" कुठची आणि किती घालू?)  सकाळी एकदाच कॉफी घेत असल्याने, कदाचित तेवढे पर्याय नसावेत त्यावेळी त्यांच्या कपाटात. नाहीतर अमेरिकेत साध्या साध्या गोष्टींचे इतके खंडीभर choices असतात ना की काही विचारायची सोय नाही.. मग साखर? मनात म्हंटल आता ह्या चहाच्या साखर "Analysis " ने माझी ब्लड शुगर नक्कीच एकतर एकदम high तरी होणार किंवा अगदीच Low तरी होणार.  मग आमची गाडी परत मुळ पदावर. Sugar: Regular /Artificial  का Brown ?.  आता हा  "ब्राउन"  शुगर - हा काय प्रकार बुवा ? आली का पंचाईत? मला आपली एकच पांढरी शुगर ठाऊक होती.  दिल्लीवाले भैय्ये साखरेला चिनी तर मुंबईला हिंदी भाषिक लोकं "शक्कर" म्हणतात. एवढं माझं साखरेचं अगाध "ज्ञान". मग काळाची वाढती गरज लक्षात घेऊन , माझा "ब्राउन शुगर" चा कोचिंग क्लास (विना मूल्य) सुरु. मी मनात म्हंटल ..पांडूरंगा..हरी विठ्ठला..आजच्या दिवसात "एक" कप चहा मिळू दे रे बाबा .!  Needless to say.  मग "दूध" या पौष्टिक विषयाने आमचा चहा-प्रवास, विशेष खोळंबला. Fat Free  कीं Whole  Milk  ...त्याचे फायदे/तोटे/Marketing strategies and gimmicks ..  त्यावर सध्या चालू असलेले "Research Work " etc .etc .

आत्तापर्यंत, डायबेटीस वाल्यांना साखर वर्ज्य असल्याने, चहात साखर घेणार का ? तेवढा एकच प्रश्न माझ्या परिचयाचा होता. असो. हा एकूण एक प्रकार सहन करून, तो बिचारा चहा उकळून, एकदा माझ्या घशात पडे पर्यंत, माझी जी काही दयनीय अवस्था झाली होती ..की  काही विचारू नका ..
ते काहीसं म्हणतात ना...
भिकारी:  ...........................भीक नको पण कुत्रं आवर..
सरोज:      ......................एक कप चहा नको (मातें), पण प्रश्न आवर!!
                                        (बाईंना शि.सा. दंडवत)


सौ. सरोज प्रशांत जावकर (गोवेकर)
26th Jan 2017

(मंडळी, जर का तुम्हाला ताजमहाल च्या सान्निध्यातला, झाकीर भाईंचा तबला ऐकत चहा प्यावासा वाटला, तर just  click on this link..... अरे हुजूर... वाह ताज बोलिये!   Cool ना ? .....!! ) हा लेख वाचल्यावरची, माझी संभाव्य "चहा-बंदी" मला समोर स्वच्छ दिसतेय...पण हा फक्त विनोदाचा भाग आहे...मी अजूनही चहा पाण्यासारखाच पिते.....धन्यवाद.......मिलते रहेंगे !!!!)





  



No comments:

Post a Comment