Tuesday, January 23, 2018

भाड्याने आणली सासू ..... एक सुखद नाट्यानुभव!

भाड्याने आणली सासू - एक सुखद नाट्यानुभव!

"भाड्याच्या सासूने मला काय दिले? हा विचार गेले वर्षभर माझ्या मनात घोळत आहे. एक आत्मविश्वास, सख्या -- १० मैत्रिणी, हसत खेळत मजामस्करी करत घालविलेले सुखद क्षण आणि असंख्य मजेशीर आठवणी. ह्या नाटकाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाकडून बरंच काही शिकायला मिळाले!

२००८ च्या गणेश चतुर्थी निमित्त  सौ.तृप्ती श्री.मंदार कुलकर्णी यांच्या घरी भेटलो असताना, ह्या नाटकाची दिग्दर्शिका सौ.पल्लवी सप्रे, हिने सहज नाटक बसविण्याचा विषय काढला. पण त्यावेळी माझा आणि नाटकाचा काडीमात्र संबंध नसल्याने मी काही फारशी उत्सुकता दाखवली नाही, परिणामी चर्चेतही विशेष रस घेतला नाही. ज्या गावाला आपल्याला जायचे नाही, त्याचा पत्ता तरी उगाच कशाला विचारा? यापूर्वी मी कधीही नाटकात काम केलेलं नसल्याने, नाटकाविषयी मनात बरेच कुतूहल होते. मनात नाटकाविषयी विचार गोंधळत होते. एकीकडे उत्कंठा वाढत होती, तर एकीकडे वाटत होते ...जाऊ दे ना..आधीच डोक्याला ताप काही कमी का आहे? हे नवीन विकतचे दुखणे कशाला घ्या?  किंबहुना आयुष्यात एकदा तरी एखादी नवीन गोष्ट करून त्याचा अनुभव घ्यावा आणि ती करत असतांना त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींची शिदोरी आपल्या जवळ बाळगावी अस मला नेहमीच वाटत असल्याने होय नाही करत करत, माझी ढकल गाडी हळुहळु पुढे सरकायला लागली.  त्यानुसार "नाटकात काम करणे" - ह्या नवीन उपक्रमाची “To Do List” च्या भल्या मोठ्या यादीत भर पडली.

"दुर्गाबाई" च्या भूमिकेसाठी निवड केल्याचे पल्लवीने मला सांगितले. नोकरी, मुलांच्या शाळा अभ्यास ह्यात पूर्णपणे व्यस्त असल्याने परत नाटकासाठी वेळ काढता येईल का?”, अशी मनात दाट शंका असल्याने, होकार द्यायचे धाडस होत नव्हते. वेळेअभावी मी थोडीशी टाळमटाळ करायचा पुरेपूर प्रयत्न केला पण पल्लवीने माझी डाळ काही शिजू दिली नाही. येत्या रविवारी स्क्रिप्ट वाचायला भेटू असे सांगितले देखील. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळ्याजणी म्हणजे मी, मोना नळगीरकर, सायली सावंत, अश्विनी साठे, नीलम कुळकर्णी, अनिता कलमदानी, स्वाती कुळकर्णी मालविका सबनीस, पल्लवीच्या घरी पहिल्यांदा भेटलो. पात्रांची निवड साधरणत: पल्लवीने मनात ठरविल्याने, आम्ही त्याप्रमाणे पूर्ण एकांकिका वाचून काढली. मनातून भीतीही वाटत होती पण डगमगता ह्या "दुर्गाबाई" च्या भूमिकेचे आव्हान स्वीकारायचं  मी मनाशी पक्कं ठरवलं.  अश्याप्रकारे हसत खेळत आम्हा नवशिक्या हौशी कलाकारांच्या नाट्यप्रवासाचा "श्रीगणेशा" झाला.

ह्या विनोदी एकांकीकेतील प्रमुख पात्र म्हणजे "दुर्गाबाई" - कार्यालयातील स्वयंपाकीण.  प्रसंगानुरूप अवास्तव महत्व प्राप्त झाल्याने ती परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवते धम्माल करते. असा हा हलका फुलका विषय. आठवड्यातून २/३ वेळा भेटून दोन-अडीच तास नियमितपणे आम्ही नाटकाचा सराव करू लागलो.   संध्याकाळी कामावरून, सगळ्याजणी दमून-भागून आपली सगळी कामे, मुलांचे अभ्यास, घरातल्या सगळ्या  जबाबदार्‍या सांभाळून धावत पळत येऊ लागलो.  मजा-मस्करी करत करत कधी दहा वाजायचे ते कळायचेच नाही. 

आमच्यापैकी फारच थोड्या मंडळींना नाटकाचा अनुभव असल्याने प्रत्येकीची जिद्द, हौस आत्मियता वाखाणण्याजोगी होती.  आम्हा सगळ्यांना "सनी" न चुकता बेसमेंट मध्ये भेटायला येत असे. अश्या भुवया उंचवायला काय झाल? सनी म्हणजे सनी देओल नाही काही, पल्लवीचा कुत्रा! आमच्या नाटकाच्या दोन हिरोइन्स - शुभांगी गडबडे (सौ.स्वाती कुळकर्णी) व वसुधा घोटाळे (सौ. सायली सावंत) -- त्यांपैकी पाळीव प्राण्यांची मनस्वी भीती बाळगणार्‍या आमच्या स्वातीबाईंना, एकदा नाटकाचे डायलॉग्ज बोलत असताना सनी केव्हा तिच्या बाजूला येऊन उभा राहिला, ते तिला कळलंच नाही. सनी साहेबांचे आगमन झाल्याचे जेव्हा तिच्या ध्यानात आल, तेव्हा तिने घाबरून एवढ्या जोरात बाजूच्या सोफ्यावर टुणकन उडी मारली की बिचारा सनीच घाबरून पार गोरा-मोरा होऊन गेला आणि गणित चुकल्या सारख्या नजरेने पहायला लागला. असो.

नियमीत सरावासरशी आम्हा सर्वांचा आत्मविश्वास ह्ळुह्ळु वाढु लागला. जसं जसं पाठांतर पक्कं होऊ लागलं, तसतशी अभिनयाची गोडी महत्व कळु लागले.  आत्तापर्यंत पेपरात, टी.व्ही वर मोठमोठ्या कलवांतकडून भूमिकेत शिरण्याबद्दल बरच काही ऐकल होत, पण आता आयुष्यात पहिल्यांदा "भूमिकेत शिरणे" म्हणजे नक्की काय? ते अनुभवल.  स्टेजवरच्या हाल-चाली, आवाजातील चढ उतार, शब्दांची फेक, प्रेक्षकांकडे बघुन बोलायची कला... ह्या सारख्या बर्‍याच छोट्या-मोठ्या गोष्टी, पल्लवी कडुन शिकायला मिळाल्या, त्याबद्दल मी तिची खूप आभारी आहे. असो. 
ह्या नाटकातील प्रमुख पात्र म्हणजे "दुर्गाबाई" – नऊवारी साडी, केसांचा आंबाडा, ठसठशीत कुंकू, हातात हिरवा  चुडा, आणि अंगावर असंख्य उसने दागिने असा हा एकंदरीत त्यांचा खाक्या! ह्या नाटकात मला तीन-चार मिनिटात साडी बदलून यावी लागत असे.  मी साडी बदलून आले की सगळ्यांचा जीव भांड्यात पडे आणि त्याला कारणे ही  तशीच होती.  ह्या नऊवारी साडीने माझी चांगलीच दमछाक केली. कधी नाडीच आत जायची तर कधी ह्या pre-stiched साडीत पाय भलतीकडे जायचा.  जेमतेम ही साडी लपेटून मी परत entry घेत असे.  असो. अश्या अनेक गमती जमती सांगण्यासारख्या आहेत पण ह्या भाड्याच्या सासू मुळे माझी नऊवारी नेसण्याची हौस पुरती फिटली आहे!

"दुर्गाबाई" चांगलीच खादाड असल्याने, माझी चांगलीच शाब्दिक चंगळ होत असे. पुडाच्या वड्या, बेसनाचे लाडू, साजूक तुपातला शिरा, बटाटेवडे, केळी, दाणे, बिस्किटे, लोणी लावलेला पाव, दुध दिवसातून असंख्य वेळा घेतलेला चहा!   नाटकानंतर मी जेव्हा जेवणासाठी उभी होते तेव्हा खुप जण म्हणाले की काय हो दुर्गाबाई? एवढ सगळ खाऊन तुम्ही परत जेवणार? असो.

आता ह्या नाटकातल्या प्रत्येकीकडून मला काहीतरी चांगल शिकायला मिळालं आणि त्याचा उल्लेख मी आवर्जून करू इच्छिते.  सौ.अश्विनी साठे म्हणजे "हेमी". आम्हा सगळ्यांत वयाने लहान असलेल्या अश्विनीने प्रयत्नांच्या जोरावर आपली कामगिरी चोख बजावली.  ह्या नाटकातील प्रमुख पात्रे - शुभांगी गडबडे आणि वसुधा घोटाळे -- सौ.स्वाती कुळकर्णी आणि सौ.सायली सावंत.  वाचनाची अत्यंत आवड असलेल्या स्वातीकडून दांडग्या पाठांतराचा प्रत्यय आला तर सर्वगुणसंपन्न सायली मॅडम यांच्याकडून उत्कृष्ट अभिनयाची प्रचीती आली.  आनंदीबाई म्हणजे सौ.अनिता कलमदानी - प्रकृतीच्या तक्रारी वर मात करून आत्म्-विश्वासाने आपल्या परीने उत्तम "आनंदीबाई" रेखाटली.  विमलाबाई म्हणजे आपल्या सौ. नीलम कुळकर्णी.  एका प्रसंगी, सायली आपल्या चुका लक्षात आल्याने, सासुच्या म्हणजे विमलाबाईंच्या खांद्यावर डोके ठेवून मुसमुसून रडते.  प्रॅक्टीस च्या वेळी, सायली तिच्या खांद्यावर डोक ठेवायला गेली की नकळत नीलम तिला ढकलून तरी देत असे किंवा स्वत: तरी दोन पावले मागे सरकत असे आणि हो! नित्यनियामाने  हा प्रकार झाला रे झाला, की आम्ही सगळ्याजणी अगदी जोरजोरात खदखदुन हसायला लागायचो. तेव्हा आम्हा सगळ्यांना पोट भरून हसविल्याचे श्रेय सौ.नीलम यांना देणे भाग आहे. त्यानंतर आमच्या मिस. नंदा म्हणजे सौ.मालविका सबनीस. जर नाटकाच्या तालीमीला कोणी गैरहजर असेल तर मोठ्या उत्साहाने, मालविका ती भूमिका करून वेळ मारुन न्यायची.  एकदा तर, काही कारणास्तव तीन-चार जणी येऊ शकल्याने, त्यांचे डायलॉग्ज वाचायच काम मालविकाच्या गळ्यात पडल. प्रत्येकीचे डायलॉग्ज हुबेहुब बोलून मात्र, नंदामॅडम एकावेळी आपण नक्की कोणती भूमिका करतो आहोत याचा पुरता गोंधळ झाल्याने, स्वतःच्याच ओळी पार विसरून गेल्या. असो. एका प्रसंगात मालविका(मिस.नंदा) आणि मी(दुर्गाबाई) बिस्किटाची झोंबाझोंबी करत असतो, तर त्या वेळी लहान मुलांना खूप मजा वाटायची.  बाकी इतर माझ्या स्वत:च्या मुलांनी देखील मला विचारल की Mom did you get that cookie? Who won? असो. सौ. तृप्ती कुलकर्णी (धन्वंतरी कडमडकर) गंगवा (सौ.मोना नळगीरकर), फॅशनची विशेष आवड असलेल्या ह्या  दोघिंकडून नेहमी टिपटॉप राहायची, सवय लागली. या सगळ्यात अतिशय महत्वाचे काम म्हणजे "prompting" आणि सौ.जान्हवी चौबळ यांनी अजिबात कंटाळाता संपूर्ण वेळ केले. सौ.संजीवनी पालेकर ने "बॅकस्टेज" तयारीला मदत केल्याने, मला म्हणजे "दुर्गाबाईला" उसन्या घेतलेल्या लुगड्यांची फॅशन परेड, करायला खुपच मदत झाली. त्याबद्दल जान्हवी संजीवनीचे मी विशेष आभार मानते.

सौ.पल्लवी सप्रे ह्या नाटकाची दिग्दर्शिका म्हणजे आमचा म्होरक्या हो! दिग्दर्शनाची पहिलीच वेळ असून देखील पल्लवीने बाजी मारली. नाटकाविषयीचे प्रेम अत्यंत आवड असल्याने, आम्हा नवशिक्यांना एकत्र जमवून, योग्य ते मार्गदर्शन करून ही एकांकिका बसवली. असो.
“आधी पोटोबा, मग विठोबा" ही सर्वश्रुत म्हण, आम्ही सगळ्याजणींनी अगदी मनोभावे आचरणात आणली.  बरेचदा रविवारी सगळ्यांना नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ मिळाल्याने, आमच्यातल्या बर्‍याच जणी  एका पेशा एक सरस पदार्थ बनवून आणायचो. आज प्रॅक्टिस किती वाजता आहे, त्यापेक्षा आज कोण काय छान छान खायला आणतय?, ह्या  "खानाखजाना" स्टेशनावर आमची गाडी, हिरवा बावटा मिळायची वाट बघू लागायची.  मघाशी मी सायलीचा उल्लेख "सर्वगुणसंपन्न " असा केला. अभिनय, नृत्य, गायन इ. कलांत् पारंगत असलेली आमची सायली, उत्कृष्ट स्वयंपाक बनविण्यात देखील निपुण आहे.  एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ, ती अगदी मन ओतून, आवडीने करायची आणि आम्हा सगळ्यांना खाऊ घालायची.  त्याचप्रमाणे पल्लवीसुद्धा नेहमी वेळात वेळ काढून वेगवेगळे रुचकर पदार्थ बनवित असे. नवीन नवीन रेसिपीज ट्राय करून, आमच्या म्हणजे - हक्काच्या मैत्रीणींवर पाककलेचे प्रयोग करीत असे.   एकतर मोठ्या बहिणीसारखी  खास मैत्रिण आणि त्यात भरीस भर - "डायरेक्टर बाई", न खाऊन सांगतो कोणाला?  असो, तर हा  निव्वळ  विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर स्वातीचा- शिरा व पास्ता,  मोनाचे  टोमॅटोवाले  पोहे,  नीलमची – भजी व दुधी हलवा, अनिताचा -शेवेचा उपमा  व साबूदाण्याची खिचडी,  सायली चे  वेज. मन्चुरिअयन, कोथिंबिरीची भजी, उपमा व  नान-कटाई  , जान्हवीचे खाज्याचे कानवले, अश्विनीची कोथिंबीर वडी , पल्लवीचे इडली सांबार, मिसळ पाव, बनाना ब्रेड  व पाव-भाजी इ. खमंग पदार्थ  खास लक्षात ठेवण्याजोगे होते आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे एकत्र बसून गप्पांच्या ओघात,  ह्या सहभोजनाचा आनंद द्विगुणीत होत असे.   नाटकानंतर आम्ही अश्विनीच्या   घरी "कास्ट पार्टी"  साजरी केली.

आता "नवरे मंडळी" यांच्या सहकार्याशिवाय हे जमणं अवघड होतं. सर्व प्रथम हे नाट्क दिवाळीला फार फार तर स्वातीच्या बेसमेंट मध्ये करायचे ठरले होते.  पण सेटशिवाय मजा नाही, म्हणून मग भाड्याच्या सेटची शोधाशोध सुरू झाली. मंडळाच्या आर्थिक चणचणींमुळे भाड्याचा सेट आणण परवडल नाही. तेव्हा श्री.प्रशांत जावकर, श्री.किशोर सप्रे आणि श्री.शेखर पालेकर यांनी पुढाकार घेऊन श्री.योगेश चवरकर, श्री.सचिन सावंत, श्री.मंदार कुलकर्णी श्री.भूषण कुलकर्णी यांच्या समवेत स्वस्त आणि मस्त सेट उभा केला. श्री.मकरंद नळगीरकर यांनी पात्र-परिचय श्री.गोपाळ कामत यांनी ध्वनी संयोजनाची बाजू संभाळली.

प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात सासूबाई ह्या असतातच.  त्याचप्रमाणे जोडीला जीवाभावाच्या मैत्रिणी, अगणित नातेवाईक, चिकित्सक शेजारी आणि घराचा अविभाज्य घटक असलेला कामगार वर्ग म्हणजे स्वैपाकिण बाई, धुण-भांडी करणारी बाई यांची भर असते.  त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या संवादातून खुलत गेलेल्या ह्या एकांकिकेला विशेषत: स्त्रि प्रेक्षक वर्गाकडून विशेष दाद मिळाली आणि त्याच मुख्य कारण म्हणजे ह्या नाटकातील प्रत्येक पात्र, कुठेतरी नकळत प्रेक्षकांशी जवळीक साधून गेल. अश्या प्रकारे "भाड्याची सासू"- दुर्गाबाई बरच काही देऊन, मनात कायमच घर करून गेली. असो.

ह्या रोजच्या धावपळीच्या, दगदगीच्या आपल्या सगळ्यांच्या जीवनात मी दोन क्षण हसवून, आनंद देऊ शकले याचा मला अभिमान वाटतो!!!!

आपली,
सौ.सरोज जावकर उर्फ दुर्गाबाई!



                           

No comments:

Post a Comment